“वाल्मिक कराडला कोणी घडवलं, तो कोणाच्या पाठबळामुळे मोठा झाला, असा सवाल प्रकाश सोळंके यांनी उपस्थित केला. राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
बीड: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिक कराडचा सहभाग स्पष्ट झाल्यानंतर धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा, या मागणीला जोर मिळत आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिर्डी येथील शिबिरात (NCP Shirdi Shibir) धनंजय मुंडे यांनी विरोधकांना थेट इशारा देत आपली भूमिका स्पष्ट केली. अजित पवार (Ajit Pawar) यांनीही धनंजय मुंडे यांची बाजू घेत राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे संकेत दिले. तरीही, धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदावरून अजित पवार गटात नाराजी असल्याचे स्पष्ट झाले.
माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी धनंजय मुंडेंना अजित पवारांनी दिलेल्या राजकीय पाठिंब्याबाबत नाराजी व्यक्त केली. बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद धनंजय मुंडेंना दिले नाही, ही योग्य गोष्ट झाली. संतोष देशमुख हत्याप्रकरणामुळे बीड जिल्ह्याची प्रतिमा मलीन झाली आहे. जिल्ह्यातील अवैध धंदे, वाळू उपसा, राखेची वाहतूक, मटका यांसारख्या आर्थिक उलाढालींवरून चर्चा रंगली आहे. धनंजय मुंडे पालकमंत्री असताना हे सर्व घडले. यामुळे आम्ही अजित पवार यांना मुंडेंना पालकमंत्रीपद देऊ नका, अशी विनंती केली होती. त्यांच्या मंत्रिपदावरही विचार करावा, अशी सुचना केली होती. मात्र, बीडची स्थिती पक्षनेतृत्वाच्या लक्षात येत नसल्याबद्दल सोळंके यांनी खंत व्यक्त केली.
वाल्मिक कराड धनंजय मुंडेंमुळेच मोठा झाला: प्रकाश सोळंके
धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीच्या शिबिरात वाल्मिक कराडशी आर्थिक हितसंबंध नसल्याचे सांगितले. मात्र, प्रकाश सोळंके यांनी वाल्मिक कराड धनंजय मुंडेंमुळेच मोठा झाल्याचे म्हटले. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून मुंडे कार्यरत असताना जिल्ह्याचा अनिष्ट विकास झाल्याचा आरोप सोळंके यांनी केला.
मी अभिमन्यू नाही, अर्जुन आहे: धनंजय मुंडे
धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीच्या शिबिरात विरोधकांना इशारा देत बिनबुडाचे आरोप करणाऱ्यांना आव्हान दिले. ‘मी अभिमन्यू नाही, अर्जुन आहे,’ असे म्हणत त्यांनी आपली राजकीय भूमिका ठाम असल्याचे दाखवून दिले.”